22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात दोनच साहेब एक पवारसाहेब आणि दुसरे बाळासाहेब

महाराष्ट्रात दोनच साहेब एक पवारसाहेब आणि दुसरे बाळासाहेब

खासदार अमोल कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार

पुणे : खेड आळंदी येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले आणि आता आपणच साहेब असल्याची मिश्किल टिप्पणीही केली. अजित पवार यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. फक्त पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही, असा टोला कोल्हे यांनी लगावला आहे.

अजित पवारांवर निशाणा साधताना अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रात साहेब दोनच आहेत. एक शरदचंद्र पवारसाहेब आणि दुसरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाच आमची पिढी तरी साहेब मानते. फक्त एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, सामाजिक व्यासंग असेल, दुस-याच्या जीवावर नव्हे तर स्वत:च्या कर्तृत्वावर उभे राहणे असेल किंवा संकट आल्यानंतर पळून न जाता संकटाला छातीवर झेलणे म्हणजे पवारसाहेब असणे आहे आणि हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने अजितदादांनी सांगण्याची गरज नाही अशा शब्दांत कोल्हे यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे.

अजित पवार नक्की काय म्हणाले होते?
तीर्थक्षेत्र आळंदीसह खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते यांच्या जनसंवाद दौ-याला अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली, तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारापर्यंत गाडी पोहोचली आहे. आता दिव्यापर्यंत गाडी पोहोचवण्यासाठी साथ द्या. दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो. आता आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही. आता आपणच साहेब आहोत असे अजित पवारांनी म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR