नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता सा-यांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे मान्सूनची चाहूल लागली असताना र्नैंंऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच येत्या १० जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार विदर्भातही दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वा-याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ३०-५० किमी प्रती तास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर आजपासून पुढील ५ दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी काळात विदर्भात सर्वत्र तुरळक ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळण्याचाही अंदाज आहे.
झाडे कोलमडली, विद्युत खांबांची पडझड
गोंदियात काल शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा शहारवाणी परिसराला बसला आहे. वादळी पावसामुळे अनेक घरांवरील टीन पत्र्याचे छत उडाले. तसेच झाडांची आणि विद्युत खांबांची पडझड झाली. गोंदिया जिल्ह्यातील शहारवाणी परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास १५ ते २० मिनिटे झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अनेक मोठी झाडे उन्मळून पडली आहेत, तर अनेक विद्युत खांब पडल्याने विज पुरवठा खंडित झाला आहे. या सोबतच शेतक-यांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांनी आता शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
शेतकरी मशागती नंतर लागवडीच्या प्रतीक्षेत
ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी आणि वादळी पावसाने अनेकदा हजेरी लावली. त्यामुळे जमीन ओलसर असल्याने शेतक-यांना उन्हाळवाईची मशागत करण्यास शेतक-यांना सोपे गेले. मशागतीची कामे आटोपली असून काही भागात तर जोरदार पाऊस झाल्याने शेतक-यांनी लागवडीस सुरुवात केली. ज्या शेतक-यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतक-यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही केली. शेतक-यांनी बियाणे, खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.