मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शुक्रवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, यामध्ये कुठेही मॅचफिक्सिंग नाही, याबाबतीत आता आपण खूप पुढे गेलो आहोत, आपण भूमिका घेतली आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
बैठकीत संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्याला हेच वाटते की आम्ही एकच आहोत. कशाला वाईटपणा घ्यायचा असे तुम्हाला वाटत असेल, पण आता आपण पुढे आलो आहोत. कुठेही कसलीही मॅचफिक्सिंग नाही. आता आपल्याला कोणालाही फसवायचे नाही. जी भूमिका घेतली आहे, त्यात आता कोणताही बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे अजित पवारांनी सांगितले.
घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहायचे, असे देखील अजित पवारांनी म्हटले आहे. मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या. लोकसभेनंतर चार महिन्यातच विधानसभा लागणार आहेत, अशा सूचना देखील अजित पवारांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्रालयाजवळील महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे देखील उपस्थित होते.