22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरकांद्याची आवक घटूनही दरात वाढ नाही

कांद्याची आवक घटूनही दरात वाढ नाही

सोलापूर – येथील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या तीन-चार दिवसांपासून कांद्याची आवक निम्म्यावर आली आहे. आवक घटूनही दरात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी आठशे ते हजार ट्रक कांद्याची आवक होत होती. दरही तेजीत होते. त्यावेळी प्रतिक्विंटल सरासरी अडीच हजार ते साडेचार हजारपर्यंत कांद्याची विक्री होत होती.

त्यावेळी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना कांद्यातून चांगले पैसे देखील झाले. दरम्यानच्या काळात किरकोळ बाजारात कांदा ४० ते ६० रुपये प्रमाणे विकला जात होता. दिल्लीसारख्या महानगरामध्ये कांदा शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना केंद्र शासनाने अचानकपणे निर्यातबंदी केली. तेव्हापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक होत आहे. वाढलेली मजुरी, खते बियाणे व औषधांचे वाढलेले दर पाहता सध्याचे दर परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप हंगामातील लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जानेवारी अखेरपर्यंत ८० टक्के जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कांदा संपण्याची चित्र दिसून येत आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांतील लेट खरीप कांद्याची आवक सुरू होईल. सध्या सोलापूर बाजार समितीत सोलापूरसह मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर तसेच कर्नाटकातील कलबुरगी, बिदर, विजयपूर या जिल्ह्यांतून कांद्याची आवक होत असून येथील कांद्याला दक्षिण भारतातील हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवअनंतपूरम आणि कोलकाता आदी महानगरांतून मोठी मागणी असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. त्या महानगरांमध्ये कांदा पाठवण्यासाठी खरेदीदार सोलापुरात तळ ठोकून आहेत.

कच्चा कांदा आणि निर्यातबंदीमुळे दरात घट गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी घाबरून जाऊन घाई गडबडीने कच्चा कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. असा कांदा लांब पल्ल्यापर्यंत टिकत नसल्याने खरेदीदार पाठ फिरवत आहेत. तसेच शासनाने निर्यातबंदी केल्याने दरावर परिणाम (घट) झाला आहे. येणाऱ्या काळात कांद्याचे आवक राज्यात कसे राहील त्यावर दर अवलंबून राहतील.असे कांदा व्यापार्‍यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR