पुणे : प्रतिनिधी
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त बुधवारी (१ जानेवारी) ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून चार हजार ८०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
‘विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या, तसेच गर्दीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे,’ अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. घातपाती विरोधी पथके तैनात राहणार आहेत,’ असेही देशमुख यांनी नमूद केले. ‘बंदोबस्तासाठी ३३६ पोलीस अधिकारी, तीन हजार ८० पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दीड हजार जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) १२ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
अग्निशमन दलाचे जवानही तेथे तैनात राहणार आहेत. आत्पकालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकदेखील असेल. प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने अनुयायी येणार असल्याने चाकण रस्त्यावर २३ एकर जागेवर वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथून अनुयायांना विजयस्तंभापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच परतण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती देशमुख यांनी दिली.
वाहने लावण्याची व्यवस्था
नगर रस्त्याने येणा-या अनुयायींच्या वाहनांसाठी शिक्रापूर (वक्फ बोर्ड) येथे ५९ एकर जागेवर वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर किमान आठ हजार वाहने लावता येतील, तसेच मुंबई-ठाणे परिसरातून येणा-या वाहनांसाठी चाकण रस्त्यावर २३ एकर जागेवर वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेत किमान चार हजार ८०० वाहने लावणे शक्य होईल.