जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपने मुस्लिम उमेदवारांवर डाव खेळला आहे, तर काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली आहे, मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सर्वच पक्षांची आश्वासने पोकळ असल्याचे सांगत यावेळी राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार बनणार नाही, असा दावा केला आहे.
माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले की, निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे दावे करत असून, आम्ही सत्तेत येणार असे म्हणत आहेत, मात्र, त्यांचे दावे पोकळ आहेत, माझी तब्येत खराब असली तरी या निवडणुकांमध्ये आम्हाला जे करायचे होते ते आम्ही करू शकलो नाही, पण इथे आमच्याकडे २० ते २२ तरुण आहेत. जे निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासाठी मी निवडणूक रॅली दौ-यावर आलो आहे. जनता आमच्या उमेदवारांना विजयाचा पाठिंबा देईल अशी आशा आहे, असे ही आझाद म्हणाले.