30.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रतिसरी आघाडी मैदानात

तिसरी आघाडी मैदानात

परिवर्तन महाशक्तीच्या नावाने तिसरा पर्याय देण्याची घोषणा

पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आज तिस-या आघाडीनेही रणशिंग फुंकले आहे. पुण्यात आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत तिसरा पर्याय देण्याविषयी मंथन करण्यात आले.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुसंस्कृत महाराष्ट्राला तिसरा पर्याय देत असल्याचे सांगितले. तिस-या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असे नाव देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या परिवर्तन महाशक्तीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिवर्तन मेळाव्यामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचे, त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. राजू शेट्टी यांनी सांगितले की, परिवर्तन महाशक्तीमध्ये सामूदायिक नेतृत्व असेल. समन्वय समिती सर्व निर्णय घेईल. २६ सप्टेंबरपर्यंत ज्यांना यात यायचे आहे, त्यांनी यावे. स्वच्छ चरित्र, स्वच्छ चेहरा देण्याची आमची कल्पना आहे.

आंबेडकरही सहभागी होणार?
परिवर्तन महाशक्तीमध्ये राज ठाकरे, मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्यात तिसरा समर्थ पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भात ज्योती मेटे, प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. मनोज जरागे यांनीही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR