मुंबई : राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून, काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान, राज्यातील याच पाणी टंचाईच्या मुद्यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. ‘सत्ताधा-यांनो आता तरी जागे व्हा, महाराष्ट्राची अधोगती होत आहे,’ असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर असताना सत्ताधा-यांकडून या प्रश्नावर कोणतेही ठोस धोरण तयार केले जात नाही. दीर्घकालीन टिकून राहणा-या धोरणांचा अभाव आहे. स्वत:च्या सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी केवळ पळवापळवीचे राजकारण सत्ताधा-यांकडून केले जात आहे. त्यात महाराष्ट्राची अधोगती होत असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी सत्ताधा-यांनी केवळ ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही अशा तालुक्यांचा यादीमध्ये समावेश केला नाही. इतके असतानाही पाण्याचे नियोजन कसे करायचे, यावर कोणतेही काम केले जात नाही. अधिवेशनामध्ये विरोधक म्हणून वारंवार या गोष्टी मांडण्यात आल्या, पण नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केले गेले, असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
सत्ता टिकवण्यासाठी सर्व खेळ सुरू
सत्ताधा-यांनो, आता तरी जागे व्हा. पाणी, वीज, बेरोजगारी, महागाई, महत्त्वाच्या सोयीसुविधा या प्रश्नांसह अन्य महत्त्वाचे मुद्दे मांडायचे असतानाही विरोधकांचीही गळचेपी केली जात आहे. राज्यात पाणीटंचाई निर्माण होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक शनिवारी-रविवारी संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय करत आहेत. याव्यतिरिक्त राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत, त्या सोडवण्याकडे जरा लक्ष द्यावे. सत्ता टिकवण्यासाठी सर्व खेळ सुरू आहे, यांना सर्वसामान्य जनतेचे काही गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न पडतो आहे, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
मराठवाड्यात पाणी टंचाई…
गेल्यावर्षी राज्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईने पाहायला मिळत आहे. अशातच मराठवाड्यात गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विहीर आणि बोरवेलने देखील तळ गाठले आहे. विशेष म्हणजे ऐन हिवाळ्यात अशी परिस्थिती असताना, उन्हाळ्यात आणखी चिंता वाढण्याची शक्यता आहे.