मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौ-यावर टीका करताना आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणणारे आता दिल्लीत लोटांगण घालत का फिरतायत? असा उपरोधिक सवाल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या दिल्ली दौ-यावर आहेत. तेथे ते काँग्रेस तसेच इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौ-यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने टीका केली जाते. आता ठाकरेंच्या दिल्ली दौ-यावर शिंदे गट टीका करून याची परतफेड करत आहे. जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणत होते, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला गेले आहेत? संजय राऊत हे तर वाढपीच्या भूमिकेत आहेत. कोणाला लोणचं द्या, कोणाला पाणी भरून दे… जे एकेकाळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागा वाटपासाठी येत होते, आता ती परिस्थिती राहिलेली नाही, असे टोला शिरसाट यांनी लगावला.
मराठा समाजाला ख-या अर्थाने स्वतंत्र आरक्षण देऊन तेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. लोकसभेला खाल्लेली ठेच लक्षात घेता, आम्ही आमच्या जागा घेऊच; पण या वेळी उमेदवार निश्चितीमध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही. आमच्या जागांचा निर्णय आम्ही घेऊ, असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.