मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना संधी न देण्यात आल्यामुळे भुजबळ पक्षावर नाराज आहेत. यासंदर्भात भुजबळांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही नाराजी बोलून दाखवत खोचक टीका केली. त्यानंतर जहां नहीं चैना, वहां नहीं रहना, असं सूचक विधान भुजबळ यांनी केले होते. तसेच आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
त्यानंतर काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमके काय चालले आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, भुजबळ यांच्या नाराजीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सूचक विधान केले आहे. ज्यांना जिथे जायचे ते तिथे जाऊ शकतात असे मोठे भाष्य कोकाटे यांनी केले. एवढंच नाही तर छगन भुजबळांचे पक्षाने खूप लाड केले, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
छगन भुजबळांची नाराजी दूर झाली आहे का? त्यांना दिल्लीत पाठवायचे होते का? पक्षात अशी काही चर्चा झाली का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, छगन भुजबळ कधी नाराज होते? तुम्हाला कोणी सांगितले ते नाराज आहेत? ते नाराज आहेत असे मला वाटत नाही. जो जे वांछील तो ते लाहो. ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतील. त्यांना केंद्रात जायचं तर ते जाऊ शकतील. माझे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस हे आहेत. माझे नेते दुसरे कोणीही नाही असे सूचक विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.