लखनौ : आयआयटी बीएचयूच्या कॅम्पसमध्ये असलेल्या कर्मणवीर बाबा मंदिराजवळ एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. कुणाल पांडे, बाजरडिहा येथील जीवधीपूर येथील रहिवासी आनंद, सक्षम पटेल अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे खळबळ माजली होती. तिन्ही आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. हे तिघेही गेल्या निवडणुकीत भाजप आयटी सेलमध्ये सहभागी होते.
१ नोव्हेंबरला रात्री दिडच्या सुमारास विद्यार्थिनी आयआयटी बिएचयू मधील न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून फिरायला निघाली होती. यावेळी तिला गांधी स्मृती चौकात एक मित्र भेटला. त्यानंतर दोघे कर्मनवीर बाबा मंदिराजवळ पोहोचले. तेव्हा बुलेटस्वार तीन तरुण मागूण आले. त्यांनी विद्यार्थिनीच्या मित्राला धमकावले. धमकी देऊन त्याला पळवून लावले. त्यानंतर तीन नराधमांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केले. आरडाओरड केल्यास विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकीही दिली. तिचा फोनही हिसकावून घेतला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी हे तिघेही चेतगंजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्याचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावेळी त्यांच्यावर संशयित म्हणून आरोप करण्यात आले होते. परंतु कोणतीही पुष्टी झाली नव्हती. दरम्यान पोलिसांनी खातरजमा करून अटक केली आहे.