चंद्रपूर : चंद्रपुर जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एक वाघाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या ५ दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात विविध कारणांमुळे ३ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वन्यजीव प्रेमी चिंतेचे आहेत. गेल्या पाच दिवसांतली ही सलग तिसरी घटना घडल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सोमवारी सकाळी सावली तालुक्यातल्या सामदा गावाजवळील एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. शेतात हा मृत वाघ आढळल्यानंतर वनपथक घटनास्थळी पोहचले आणि मृत्यूबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी (२४ डिसेंबर) शिकारीच्या शोधात असतांना विहीरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाला होता. नागभीड तालुक्यातील गोविंदपूर शेत शिवारातील ही घटना घडली. मृत वाघ नर असून अंदाजे दीड वर्ष त्याचे वय होते. तसेच २१ डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात शिकारी करिता लावलेल्या विद्युत प्रवाहाचा करंट लागून एका वाघाचा मृत्यू झाला. मृत वाघ नर असून अंदाजे दोन ते अडीच वर्ष त्याचे वय होते. सरकारकडून मिळालेल्या निधीच्या चौकशीची वन्यजीव प्रेमींनी मागणी केली आहे. सलग तीन वाघांच्या मृत्यूने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र असे असतांनाच वाघांच्या अपघाती मृत्यूंमध्ये देखील वाढ झाली आहे, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे वाघांच्या अपघाती मृत्यूंच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाघांच्या संरक्षणाचा मुद्दा ‘राम भरोसे’ तर नाही ना, असा सवाल या निमित्याने उपस्थित केला जात आहे.