पाटणा : लोक जनशक्ती पार्टी पासवान गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी तीन वर्षांपूर्वी माझा पक्ष फोडून माझे राजकीय करिअर संपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच पक्षाचा पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानले.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. २०२५ मध्ये ही निवडणूक होऊ घातली असून लोकसभेला एनडीएत गेलेल्या चिराग पासवान यांनी अचानक भाजपविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. यातच चिराग यांचे काका पशुपती पारस यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने बिहारमध्ये भाजप काहीतरी खेळ करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
जेव्हा मी संघर्षाच्या काळातून जात होतो, आजही २०२१ चा तो दिवस आठवतो. माझा पक्ष तुटला. मला सर्व पदांवरून काढून टाकण्यात आले. माझी राजकीय खेळी संपवण्याचा प्रयत्न झाला, पण तुमच्या प्रेमाने, पाठिंब्याने आणि विश्वासाने मला तुटू दिले नाही आणि झुकू दिले नाही, असे चिराग पासवान म्हणाले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १०० टक्के स्ट्राइक रेटसह आपण हाजीपूर, वैशाली, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई या पाचही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) राष्ट्रीय स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, असे ते म्हणाले.