मुंबई : प्रतिनिधी
‘लाडकी बहीण’ योजनेचा फुकटचा पैसा महिना, दोन महिने पुरेल, पण यामुळे महाराष्ट्र दिवाळखोरीतून निघून कंगाल होईल त्याचे काय, असा सवाल राज यांनी केला आहे. राज्यावरची अगोदरचीच कर्जे फिटलेली नाहीत, त्यात आणखी एक लाख कोटींवर कर्ज होईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजना जेव्हापासून शिंदे सरकारने लाँच केली तेव्हापासून ती सुरू राहणार का, राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहील आदी दावे केले जात होते. हे दावे सत्ताधारी खोडून काढत होते. अजित पवारांनी तर हे पैसे कसे उभे करणार, जीएसटी, कर आदी गोष्टींचे हजारो कोटींचे गणितच मांडले होते.
‘लाडक्या बहीण’ योजनेमुळे महिला वर्ग लांब जाईल या भीतीने विरोधकांनीही आधी केलेला विरोध शांत करून आमचे सरकार आले तर महिन्याला ३००० रुपये देणार इथपर्यंत भूमिका बदलली होती. यावर आता राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, फुकट पैसे देऊन आपण लोकांना लाचार करत आहोत. तरुणांना पैसा मिळाला तर ते काहीच काम करणार नाहीत. ड्रग्ज किंवा अन्य व्यसनांना सुरुवात करतील. शेतक-यानेसुद्धा वीज फुकट मागितलेली नाही. त्यापेक्षा विजेमध्ये सातत्य द्या, कमी भावात द्या, हातांना काम द्या, असा सल्ला राज यांनी दिला आहे.
बहिणींना सक्षम बनवा
कोणतीही गोष्ट फुकट देता कामा नये, कोणी फुकट मागत नाही. लाडक्या बहिणींनी तरी कुठे म्हटले की फुकट द्या, त्यापेक्षा त्या भगिनींना सक्षम बनवा, चांगले उद्योगधंदे आणा, चांगल्या गोष्टी करा, त्यांना सक्षम बनवा व मेहनतीचे पैसे येऊद्या, अशा शब्दांत राज यांनी सत्ताधा-यांवर घणाघात केला आहे.