23.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरउजनी धरणातून तिबार पंपिंग सुरू

उजनी धरणातून तिबार पंपिंग सुरू

सोलापूर :
शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औज आणि चिंचपूर बंधारे भरले आहेत. त्याने नागरिकांना दिलासा मिळाला. उजनी धरणाची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तिबार पंपिंग योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जॅकवेलपर्यंत पाणी आणले जात आहे. पाणी उपसा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहराला पाच दिवसांआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौवे यांनी सांगितले.

उजनी धरणातून शहरासाठी पिण्यासाठी पाणी सोडल्यामुळे धरणाची पाणीपातळी खालावली आहे. उजनी धरण वजा ५६ टक्के खाली गेले आहे. त्यामुळे धरणातून तिबार पंपिंगच्या माध्यमातून पाणी उपसा चालू केला आहे. यासाठी जॅकवेलपासून एक किलोमीटर धरणात १९० एचपी आणि १३५ एचपी, असे दोन पंप बसवले आहेत. त्याशिवाय १५ एचपीच्या सात पंपांच्या माध्यमातून पाणी उपसा चालू आहे. एक कोटी ३९ लाखांचा हा मक्ता नाशिकच्या बडगुजर कंपनीला दिला आहे. यासाठी मक्तेदाराच्या १५ कर्मचाऱ्यांची टीम २४ तास कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता सिद्धेश्वर उत्सुरगे, उपभियंता तपन डंके, सहायक अभियंता संतोष यलगुलवार, विजय नलावडे सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी झटत आहेत.

‘उजनी’ ची पाणीपातळी घटल्यामुळे गाळमिश्रीत पाण्याचा उपसा केला जात आहे. मोटारीमध्ये गाळ आल्यामुळे पाणी उपसा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अधूनमधून गढूळ पाणी उपसा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन चौबे यांनी केले आहे.

औज आणि चिंचपूर बंधाऱ्यामधील पाणीसाठा ५५ दिवस वापरता येणार आहे. त्यामुळे पाण्याची चिंता नाही. उजनी धरण मोठ्या प्रमाणात वजा पातळीला गेले आहे. सर्व भिस्त पावसावर आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसांआड केला जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR