22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंडेंवर तोंड न दाखवण्याची वेळ

मुंडेंवर तोंड न दाखवण्याची वेळ

ते कुठे लपून बसलेत? सुरेश धस यांच्या वक्तव्याने खळबळ

नागपूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कारण देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी सापडले आहेत ते सर्व आरोपी धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्या संपर्कातील आहेत.

तसेच कराड याच्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात सभागृहात येणारे धनंजय मुंडे हे मागील दोन दिवसांपासून मात्र विधिमंडळाकडे फिरकलेच नाहीत. मुंडे यांच्या गैरहजरेची आता सर्वपक्षीय आमदारांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. सत्ताधारी महायुतीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

हत्या प्रकरणातील आरोपींचे जे आका आहेत ते धनंजय मुंडे यांचे शागिर्द आहेत. धनंजय मुंडेंच्या शागिर्दावर (वाल्मिक कराड) एवढे सगळे आरोप होत असताना धनंजय मुंडे हे कुठे लपून बसले आहेत ते माहीत नाही. मुंडे यांनी समाजासमोर यायला हवे. त्यांच्यावर तोंड न दाखवण्याची वेळ आली असली तरी त्यांनी समाजासमोर यायला हवे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

आव्हाडांनी घेतला समाचार
वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरदहस्तामुळेच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच सरकारनेच धनंजय मुंडे यांना अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याचा सल्ला दिला असेल, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

खरा मास्टरमाईंड कराडच
खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस म्हणून ओळखला जातात. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा खरा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराडच असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्याच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल होऊन कराड याला लवकरात लवकर अटक व्हावी, तसेच धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR