18.1 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र जिंकण्यासाठी मोदींची प्रतिष्ठा पणाला!

महाराष्ट्र जिंकण्यासाठी मोदींची प्रतिष्ठा पणाला!

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अनेक पक्षांनी प्रचारसभांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये कुठे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेत प्रचार सभा घ्यायच्या याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा १८ नोव्हेंबर २०२४ रोजी थंडावणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात ८ दिवस जाहीर सभा घेणार आहेत. येत्या ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आहेत. या काळात ते विभागवार सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ नोव्हेंबरपासून विदेश दौ-यावर आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. मात्र या कालावधीतही जास्तीत जास्त सभा कशा घेतल्या जातील, याकडे महायुतीचा कल असणार आहे.

दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही स्वबळावर निवडणुका लढवताना दिसणार आहे. महायुतीकडून आत्तापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात भाजपकडून ९९, शिवसेना शिंदे गटाने ४५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR