पुणे : प्रतिनिधी
राज्यातील सर्वच बाजार समितींच्या आवारात टोमॅटोंची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. परिणामी पुणे येथील मार्केटयार्ड फळबाजारातही फटका बसला आहे. पुणे घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार चार ते पाच रुपये किलो, तर किरकोळ बाजारात एक किलोला १० ते १५ रुपये भाव मिळत असल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे.
घाऊक बाजारात टोमॅटो विक्रीस पाठविणेही शेतक-यांना परवडत नसल्याने सध्या लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर शंभर रुपयांपर्यंत गेले होते. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली होती.
टोमॅटोला भाव मिळाल्याने पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूरसह राज्यातील सर्व विभागांतील शेतक-यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. लागवड चांगली झाल्याने गेल्या महिनाभरापासून राज्यातील सर्व बाजार समितींच्या आवारात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविला. मात्र टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे.
टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय नाही
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात टोमॅटोला भाव चांगला मिळाला होता. सध्या घाऊक बाजारात ४ ते ५ रुपये किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय उरला नाही. टोमॅटोची तोडणी आणि वाहतूक खर्च परवडत नाही. एका प्लास्टिकच्या जाळीत (क्रेट) २० ते २२ किलो टोमॅटो बसतात. घाऊक बाजारात एका क्रेटला ७० ते ८० रुपये दर मिळत आहे.