27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरमध्ये भाजपचे बेरजेचे राजकारण

पालघरमध्ये भाजपचे बेरजेचे राजकारण

फडणवीसांचे बारीक लक्ष, आक्रमक प्रचारावर भर

पालघर : प्रतिनिधी
पालघर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि भाजपचे हेमंत सावरा यांच्यात लढत आहे तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत पाहायला मिळत असताना भाजपने येथे सर्व गट-तट बाजूला सारून एकजूट वाढवली असून, हेमंत सावरा यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. परंतु समोर ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे भाजपने येथे बेरजेचे राजकारण करीत आपले बळ वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. वनगा आणि सावरा गट एकत्र आणण्याची किमया त्यांनी केली. तसेच विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनाही साथीला घेतले. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. परंतु ठाकरे गटानेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे होता आणि राजेंद्र गावित विद्यमान खासदार होते. मुळात गावित हे भाजपचेच. परंतु मागच्या वेळी त्यांना शिवसेनेत पाठवून उमेदवारी दिली आणि ते खासदार झाले. परंतु यावेळी भाजपने हा मतदारसंघ शिंदे गटाकडून काढून घेताना नवा चेहरा देण्याच्या दृष्टीने माजी मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र हेमंत सावरा यांना मैदानात उतरविले. परंतु नवा चेहरा देताना पालघरमधील गट-तट एकत्र आणण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला चांगले यशही प्राप्त झाले. दरम्यान, सावरा यांना मैदानात उतरविल्यानंतर विद्यमान खासदार आपल्या साथीला कसे राहतील, याची काळजी घेत थेट त्यांचा भाजप प्रवेशही करून घेतला. एवढेच नव्हे, तर स्थानिक प्रश्न समजून घेताना स्थानिक नेते सोबत कसे राहतील आणि पालघरचा दावा मजबूत कसा होईल, या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजप आणि विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये आता शाब्दिक चकमकी झडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये आक्रमक प्रचार सुरू केला असून, गरजेनुसार बहुजन विकास आघाडीला साथीला घेऊन आता लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावरच हल्लाबोल सुरू केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांना अंगावर घेताना बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना वसईच्या बाहेर येऊ देणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
आधीच उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून आक्रमक प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यातच भारती कामडी या एका आदिवासी महिलेला मैदानात उतरवून त्यांच्यामागे ताकद उभा केली आहे. पालघरमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे भारती कामडी यांनी विरोधकांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येथे तिरंगी सामन्याचे चित्र असताना भाजप नेते फडणवीस यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे.

बेडूक फुगला तर बैल होत नाही : फडणवीस
फडणवीस यांनी मंगळवारी पालघर मतदारसंघात झालेल्या सभेत वसईवाल्यांना वसईतच ठेवू, त्यांना डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, असे म्हणत थेट हितेंद्र ठाकूर यांना लक्ष्य केले. एवढेच नव्हे तर बेडूक फुगला तर बैल होत नाही, असा टोलाही लगावला. हितेंद्र ठाकूर यांनीही तुम्ही मोदींच्या नावे मते मागता मग येथील खासदार फक्त बोट वर करण्यासाठी हवाय का, असा सवाल उपस्थित करीत जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच २०१४ आणि २०१९ मध्ये नागरिकांची दिशाभूल करून भाजप सत्तेत आल्याचा पलटवार केला.

गटा-तटाला थारा नाही
राज्यात अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली. तसेच काँग्रेस नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश देऊन विरोधकांची ताकद कमी करण्याचे काम भाजपने केले. परंतु एवढे करूनही विरोधकांनी भाजप आणि महायुतीसमोर आव्हान उभे केले. त्यामुळे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक सक्रिय झाले असून, ते महायुतीच्या बळावर नवनवी रणनीती आखत आहेत आणि ही रणनीती आखताना महायुती एकजुटीने लढली पाहिजे, याचीही काळजी घेत आहेत. त्यामुळे त्यांनी गटा-तटाला थारा नसल्याचे आधीच सांगितले. त्यातूनच पालघरमध्ये त्यांनी चिंतामण वनगा आणि विष्णू सावरा या दोघांच्याही सुपुत्रांना एका व्यासपीठावर आणले आणि खा. राजेंद्र गावित यांनाही सोबत घेऊन ही लढाई लढत आहेत. त्यामुळे मागच्या तुलनेत भाजप मजबूत स्थितीत निवडणुकीला सामोरे जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR