पूर्णा : तालुक्यातील पूर्णा-झिरो फाटा रस्त्यावरील माटेगाव येथे मागील काही दिवसांपासून जुने पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम चालू आहे. पुलाचे काम संथ गतीने चालू असल्याने दि. २ ऑगस्ट रोजी थुना नदीला पाणी आल्याने पुला शेजारच्या पर्यायी वळण रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
हा रस्ता परभणी, पूर्णा तसेच नांदेडकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमी मोठी वाहनाची वर्दळ असते. सदरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक ठप्प होत असल्याचे प्रवासी धारकातून बोलले जात आहे. सदरील पुला शेजारी पर्यायी वळण रस्ता थातूरमातूर पद्धतीने केली असल्याचे वाहनधारकातून बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी याच पुलाच्या खड्ड्यात एक कार पडल्याची घटना घडली होती. परंतु या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
एखाद्याने जीव गमावल्यावरच याकडे लक्ष देणार का असा प्रश्न वांहनधारकासह प्रवाशातून उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावरून दररोज असंख्य शाळकरी विद्यार्थी ये जा करत असतात. परंतू पर्यायी रस्त्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरून पाण्यातून प्रवास करण्याची वेळ येत आहे. संबंधित पुलाच्या गुत्तेदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे.