ढाका : बांगलादेशची राजधानी ढाक्यातील गोपीबाग भागात शुक्रवारी (५ जानेवारी) रात्री दंगलखोरांनी एक रेल्वे पेटवून दिली. या घटनेत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण नियंत्रण कक्षाचे कर्तव्य अधिकारी फरहादुझमान यांनी या घटनेला दुजोरा दिला.
सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यापूर्वी १९ डिसेंबर रोजी एका रेल्वेला आग लावण्यात आली होती, त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता.
वास्तविक, बांगलादेशमध्ये १२ व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान होणार आहे. शेख हसीना २००९ पासून पंतप्रधान आहेत आणि त्या ५ व्यांदा पंतप्रधानपदाच्या दावेदार आहेत.
बांगलादेशात ७ जानेवारीला होणा-या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा विरोधकांनी केली. यामुळे पुन्हा एकदा शेख हसीना यांच्या विजयाची शक्यता निर्माण झाली आहे.