नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत सर्व काही सुरळीत झाले तर पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या कारागिरांसाठी एका वरदानापेक्षा कमी नसेल. या योजनेंतर्गत पारंपरिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना १८ व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन ५०० रुपये भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी २० हजार रुपये देण्यात येतील. याशिवाय त्यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल, असे सांगण्यात आले.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत देशातील पारंपरिक कारागीर जसे सुतार, न्हावी, कुंभारकाम करणारे, शिंपी, हस्तकला आणि संबंधित १८ प्रकारच्या व्यवसायांशी निगडित कारागीर यांना एक आठवड्याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जात आहे आणि टूल किट खरेदी करण्यासाठी २० हजार रु. देण्यात येतील. रोजगार निर्मितीसाठी बँकांमार्फत हमीशिवाय ५ टक्के वार्षिक व्याजदराने दोन हप्त्यांमध्ये ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे. त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी (ईओ) करतील.