नागपूर : प्रतिनिधी
उमरेड-भिवापूर राष्ट्रीयमार्गावरील तास शिवारात एका भरधाव ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला जबर धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील चार प्रवाशांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला, तर २२ वर प्रवासी गंभीर जखमी असून, यातील दहावर गंभीर जखमी प्रवाशांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. सदर अपघात गुरुवारी (दि.५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास झाला.
प्राप्त माहितीनुसार ट्रॅव्हल्स (एम.एच. ४९ जे. ८६१६) ही माँ दुर्गा नामक ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन नागपूर येथून भिवापूरकडे भरधाव वेगात येत होती. दरम्यान, शहरालगतच्या तास शिवारातील बसथांबा परिसरात असलेल्या पाणटपरीशेजारी रेशनचे धान्य भरलेला (एम.एच. ३१ ए.पी. २९६६) हा ट्रक थांबलेला होता.
दरम्यान, भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकसह पाणटपरीला धडक देत थेट शेतात शिरली. यात ट्रॅव्हल्समधील एक महिला, एक मुलगा व दोन पुरुष असे चौघे थेट ट्रॅव्हल्सच्या खाली आलेत. यातील दोघांच्या शरीरावर, तर अक्षरश: ट्रॅव्हल्सचे चाक होते. माहिती मिळताच, पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले, तर दोन जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅव्हल्सखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी दहावर गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात आले आहे. अपघात इतका भयावह होता की, ट्रॅव्हलच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला असून समोरची दोन्ही चाके सुद्धा निघाली आहे. मृतकांमध्ये भिवापूर व उमरेड येथील प्रत्येकी एक, तर कन्हाळगाव ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथील एकाचा समावेश आहे. अन्य एकाची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. अपघातामुळे राष्ट्रीयमार्गावरील वाहतूक दोन तास प्रभावित झाली होती.