कोलकाता : तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये सुष्मिता देव यांना पुन्हा एकदा राज्यसभेचे तिकीट मिळाले आहे. तर पत्रकार सागरिका घोष यांना देखील टीएमसीने उमेदवारी जाहीर केली आहे.
टीएमसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी आम्ही सागरिका घोष, सुष्मिता देव, मो नदीमुल हक आणि ममता बाला ठाकूर यांना उमेदवारी देत आहोत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आशा करतो की ते भारतीयांच्या अधिकारांसाठी वकीली आणि तृणमूलच्या स्थायी वारशाला कायम ठेवण्यासाठी काम करतील, असे ट्विट टीएमसीने केले आहे. सुष्मिता देव या यापूर्वीही टीएमसीच्या खासदार होत्या.
२०२१ मध्ये काँग्रेसमधून ळटउ मध्ये आल्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. नदीमुल हक हे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. ममता ठाकूर या मतुआ समाजाच्या धार्मिक माता आहेत. त्यांनी २०१९ मध्ये बनगाव मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतू भाजपाकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. सागरिका घोष या प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका आहेत.