चंद्रपूर : गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कु-हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अलका तलमले (वय ४०), तेजू तलमले, प्रणाली तलमले अशी मृतकांची नावे आहेत. आरोपी अंबादास तलमले (वय ५०) याला पोलिसांनी अटक केली आहे. हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.
जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणा-या मौशी गावातील आरोपी अंबादास तलमले हे आपल्या दोन मुली, एक मुलगा, पत्नी यांच्यासोबत वास्तव्य करीत होता. काही महिन्यांपासून घरात कौटुंबिक कलह सुरू असल्याने ही घटना घडल्याचे परिसरात बोलले जात आहे. शनिवारच्या रात्री मुलगा बाहेर गेला होता. दोन मुली, पत्नी गाढ झोपेत होत्या, तेव्हा अंबादास तलमले याने कु-हाडीने तिघांवर सपासप वार केले.
यात पत्नी अलका, मुलगी तेजू आणि प्रणाली या तिघींचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली. या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.
बारावीचे पेपर संपण्याआधी जीवन संपविले
लहान मुलगी तेजू तलमले ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे. सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. बारावीत चांगल्या गुणांसहित उत्तीर्ण होण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र डोक्यात सैतान शिरलेल्या तिच्या वडिलांनी तिच्या स्वप्नांचा चुराडा केला.