जालंधर : पंजाबमधील जालंधरमध्ये लुधियाना हायवेवर दोन ट्रकच्या धडकेने भीषण अपघात झाला. लष्कराच्या वाहनाला एका खासगी कंपनीच्या ट्रकने धडक दिली, यात ६ जवान जखमी झाले. जखमी जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर खासगी कंपनीच्या ट्रकचा चालक घटनास्थळावरून पळून गेला.
जालंधरमधील लिस्ट पिंडजवळील इंडियन ऑईल डेपोजवळील महामार्गावरील पीएपी चौकातून पठाणकोट चौकाकडे लष्कराचे वाहन जात होते. त्याचवेळी एका खासगी कंपनीचा ट्रकही याच मार्गावरून जात होता. त्यांच्या ट्रकचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. टायर फुटल्याने ट्रकचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरील दुभाजक तोडून दुस-या बाजूने जाणा-या लष्कराच्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, लष्कराचा ट्रक पलटी झाला.
या अपघातात लष्कराचे सहा जवान जखमी झाले आहेत. जखमींना लुधियाना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.