वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ युद्ध अधिक गडद होत चालले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर ३४% शुल्क लादल्यानंतर चीनने अमेरिकेवर अतिरिक्त ३४% शुल्क लादला आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी चीनला कडक इशारा देत म्हटले की, चीनने ८ एप्रिल २०२५ पर्यंत हा ३४ टक्के शुल्क वाढ मागे घेतला नाही, तर अमेरिका त्यांच्यावर अतिरिक्त ५० टक्के शुल्क लावेल.
ट्रम्प यांनी जाहीर केले की जर चीनने सहकार्य केले नाही, तर हे नवीन शुल्क ९ एप्रिल २०२५ पासून लागू होतील. ट्रुत सोशल या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी लिहिले, काल चीनने अमेरिकेवर ३४% नवीन शुल्क लादला. हा दर आधीचा भरमसाठ कर, नॉन-कॅश फी, कंपन्यांना दिलेली बेकायदेशीर सबसिडी आणि ब-याच काळापासून चालू असलेल्या चलनातील हेराफेरी व्यतिरिक्त आहे.
हे सर्व माझ्या त्या इशा-यानंतर घडले, ज्यात मी अमेरिकेवर अतिरिक्त शुल्क लादणा-या कोणत्याही देशाला पूर्वीपेक्षा जास्त शुल्काचा सामना करावा लागेल असे म्हटले होते. जर चीनने आपल्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या व्यापार गैरव्यवहारांवरील ३४% शुल्क वाढ ८ एप्रिलपर्यंत मागे घेतली नाही, तर अमेरिका ९ एप्रिलपासून चीनवर ५०% अतिरिक्त शुल्क लागू करेल. याशिवाय चीनने प्रस्तावित केलेल्या कोणत्याही बैठकीवरील चर्चा त्वरित संपुष्टात येईल असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.