वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे मध्य-पूर्वेसंबंधात अमेरिकेची कणखर भूमिका पहिल्यांदाच समोर आली. यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्त्रायलला बाहेरून मदतीचा ओघ सुरू ठेवला. पण ट्रम्प यांनी थेट मैदानात उतरण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे तिस-या महायुद्धाची ही नांदी तर नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
२० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी गाझा पट्टीमधील हमास या दहशतवादी संघटनेला इशारा दिला. गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्या इस्त्रायली नागरिकांना २० जानेवारी २०२५ रोजी होणा-या शपथविधीपूर्वी सोडा, नाहीतर मध्य-पूर्वेत विध्वंस करेल, अशी धमकी नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
या ओलिसांना २० जानेवारीपूर्वी मुक्त करा. तसे केले नाही तर जे माणुसकी सोडून सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करत आहेत. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा असेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
इस्त्रायली नागरिक ओलीस
इस्त्रायलने युद्ध पुकारल्यानंतर त्यातील काही नागरिकांची, विशेषत: महिलांची सुटका करण्यात आली होती. तरीही २५० पेक्षा अधिक नागरीक अजूनही हमासच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये गाझा पट्टीत १०१ परदेशी नागरीक आणि इस्त्रायली नागरीक ओलीस असल्याची माहिती समोर येत आहे.