मुंबई : प्रतिनिधी
खातेवाटप मार्गी लागल्यानंतर नवे मंत्री त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. हिवाळी अधिवेशन संपवून आपापल्या मतदारसंघांत परतलेल्या नव्या मंत्र्यांचे जोरदार स्वागत सुरू आहे. मंत्रिपदासाठी लॉबिंंग करणारे आमदार आता पुन्हा एकदा फिल्डिंग लावताना दिसत आहेत. पालकमंत्रिपदाची माळ आपल्याच गळ््यात पडावी, यासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ११ जिल्ह्यांत पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.
१५ डिसेंबरला ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर खातेवाटप होण्यास आठवडा लागला. आता मंत्री नागपूरहून त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. मंत्रिपद मिळाल्यानंतर आता पुढची शर्यत पालकमंत्रिपदासाठी सुरू आहे. राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांसाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, बीड, सातारा, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही जिल्ह्यांना दोन तर काही जिल्ह्यांना चार मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. कुठे एकाच पक्षाच्या २ मंत्र्यांमध्ये तर कुठे मित्रपक्षाच्या मंत्र्यांमध्ये जोरदार चढाओढ दिसत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची शर्यत संपताच पालकमंत्रिपदासाठीची स्पर्धा सुरु झाली आहे.
ठाण्यात भाजपची फिल्डिंग
ठाण्याचे पालकमंत्रिपद सातत्याने शिवसेनेकडे राहिलेले आहे. पण आता या पदासाठी भाजपने फिल्डींग लावली आहे. ज्या सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यात सर्वाधिक मंत्री, त्यांचा पालकमंत्री, असा ढोबळ नियम आहे. त्याचाच हवाला आता भाजपकडून दिला जात आहे. जिल्ह्यात भाजप मोठा भाऊ आहे. शिवसेनेचे ६ तर आमचे ९ आमदार आहेत. ठाण्यातील आमचा स्ट्राईक रेट १०० टक्के राहिला आहे, अशी भूमिका भाजपच्या संजय केळकरांनी मांडली आहे.
या जिल्ह्यांत लॉबिंग
-ठाणे : एकनाथ शिंदे (शिवसेना), गणेश नाईक (भाजप)
-रायगड : आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), भरत गोगावले (शिवसेना)
-नाशिक : गिरीश महाजन (भाजप) दादा भुसे (शिवसेना) नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस), माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
-जळगाव : गुलाबराव पाटील (शिवसेना), संजय सावकारे (भाजप)
-पुणे : अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), चंद्रकांत पाटील (भाजप)
-बीड- पंकजा मुंडे (भाजप), धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
-छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट (शिवसेना), अतुल सावे (भाजप)
-यवतमाळ : अशोक उईके (भाजप) संजय राठोड (शिवसेना), इंद्रनिल नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
-सातारा : शंभुराज देसाई (शिवसेना) शिवेंद्रराजे भोसले (भाजप), जयकुमार गोरे (भाजप), मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
-रत्नागिरी : उदय सामंत (शिवसेना), योगेश कदम (शिवसेना)
-कोल्हापूर : हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रकाश आबिटकर (शिवसेना)