भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी दुपारी दोन गटामध्ये झालेल्या वादामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दुपारी दोन गटांमधील लोकांनी लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांना मारहाण केली. यावेळी काही जणांनी तलवारी उपसून हवेत फिरवल्या. मोठ्या प्रमाणावर दगडफेकही झाली. यामध्ये एकूण ६ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोर्चा सांभाळला. तणावपूर्ण परिस्थिती पाहून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार शहरातील जहांगीराबाद परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी शिखांचा एक गट आणि एका विशिष्ट्य धर्माच्या तरुणांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर या वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.