पुणे : पबमध्ये मद्यपान करून महागडी मोटार सुसाट चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाहतूक सुरक्षिततेवर तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून तत्काळ जामीन देणा-या बाल न्याय मंडळातील(जेजेबी) दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. राज्य शासनाने याबाबतची अधिसूचना काढून पदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत ही कारर्वाइ केली आहे.
डॉ. लक्ष्मण नेमा धनवडे आणि कविता तुळशीराम थोरात अशी या सदस्यांची नावे आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना जेजेबीच्या सदस्यांकडून पुष्कळ चुका राहिल्या आहेत, असा अहवाल या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केला होता. त्यानुसार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना चुकांबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला होता. सदस्यांचा त्यांचा खुलासा आल्यानंतर आयुक्तालयाने त्यांच्या खुलाशासह स्वतंत्र अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता. महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव आ. ना. भोंडवे यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे.
चौकशीतून काय समोर आले होते
मंडळाच्या निर्णयाबाबत चौकशी करण्यासाठी पाच अधिका-यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीने शंभरहून अधिक पानांचा अहवाल महिला व बाल कल्याण आयुक्तालयाकडे पाठविला होता. अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळातील एका सदस्याने भूमिका मांडली होती. ती भूमिका न्याय मंडळासमोर ठेवल्यानंतर दुस-या सदस्याने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एक सदस्य दोषी नाही तर दुसरा सदस्यही दोषी आहे. मंडळाने निर्णयादरम्यान पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. तक्रारीतील माहिती विचारात घेतली नाही, अशा अनेक त्रुटी आढळल्या होत्या. त्याचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.
आयुक्तांनी दिली माहिती
महिला व बाल विकास आयुक्तालयाकडून दोन्ही सदस्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ही कारवाई केली असल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.