संगमनेर : कंटेनर आणि पल्सर मोटारसायकल या दोन वाहनांच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.२०) रात्री संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत निमोण गावच्या शिवारात लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर घडला. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे अपघातस्थळी पोहोचले.
कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३०, रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि युवराज धोंडीबा मेंगाळ (वय २९) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. कंटेनर क्रमांक जी.जे. १५ ए.व्ही ६६५६ आणि पल्सर मोटारसायकल यांच्यात धडक झाली. यात दोघे जागीच मयत झाले.
संदीप संतोष आगिवले (रा. गर्दनी, ता. अकोले) यांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर दोडी (ता. सिन्नर) येथे उपचार सुरू आहे. अपघातस्थळी भेट दिली असून कंटेनर ताब्यात घेतला आहे. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांनी दिली.