20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये दोघांच्या हत्या, शहरात खळबळ

नाशिकमध्ये दोघांच्या हत्या, शहरात खळबळ

नाशिक : राज्यात सर्वत्र कायद- सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असतानाच नाशिकमध्येही दोन दिवसांत खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. सराईत गुन्हेगाराचे पंचवटी परिसरातून अपहरण करून खून करण्यात आला. तर किरकोळ कारणावरून एका रिक्षाचालकाने दुस-या रिक्षाचालकाचा चुंचाळे परिसरात खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी नाशिकमध्ये असतानाही शहरात खुनाच्या घटना उघडकीस आल्याने पोलिसांचा धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सराईत गुन्हेगाराची नाशिकमध्ये हत्या
पहिल्या घटनेत सराईत गुन्हेगार संदेश काजळे हा पंचवटीतील निमाणी बसस्थानकासमोरील सूर्या हॉस्पिटलच्या मागील पार्किंगमध्ये आला होता. त्याचे संशयित मित्र नितीन ऊर्फ पप्पू चौगुले, रणजित आहेर व स्वप्निल दिनेश उन्हवणे, पवन भालेराव आणि इतरांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाले. यानंतर काजळेस मारहाण करून त्याला कारमध्ये ढकलून अपहरण करण्यात आले.

अर्धवट जळालेला मृतदेह आढळला
प्रितेश काजळे याने पाच जणांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. रविवारी पहाटे मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजळे याचा अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना आढळून आला.

एक संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरू
त्या मृतदेहाचे वर्णन हुबेहूब काजळे याच्याशी जुळत असल्याने मोखाडा पोलिसांनी शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता संशयित उन्हवणे हा त्र्यंबक भागात असल्याची माहिती मिळाली. स्वप्निल उन्हवणे याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. उर्वरित चार जणांचा शोध पोलिस घेत आहेत.

किरकोळ कारणावरून नाशकात दुसरा खून
तर दुस-या घटनेत किरकोळ कारणावरून एका रिक्षाचालकाने दुस-या रिक्षाचालकाचा डोक्यात पहार व दंडुका घालून खून केला. शंकर गाडगीळ व आरोपी हल्लेखोर सोनू नवगिरे, सोनू कांबळे, महेंद्र कांबळे यांचा काही तरी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद त्यावेळी मिटला मात्र तिघांनी डोक्यात राग धरून रात्री पावणेबाराच्या सुमारास शंकर यास एकटे गाठले.

अर्ध्या तासात तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
त्यांच्यामध्ये पुन्हा दुपारच्या घटनेवरून बाचाबाची होऊन शंकरला मारहाण करण्यात आली. यावेळी तिघांपैकी एकाने रॉड डोक्यात मारल्याने शंकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अवघ्या अर्ध्या तासात तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR