सातारा : महाराष्ट्राला एक परंपरा आहे. छत्रपतींची कोल्हापूरची गादी असोकिंवा सातारची गादी असो. या गादीबद्दल आदर आहे. छत्रपतींच्या वंशजांनी ही गादी आचारविचाराचे पालन करुन पुढे चालवली पाहिजे. पण उदयनराजे यांची कृत्य, दुष्कृत्य साता-यात आणि सगळीकडे बघितली आहेत. उदयनराजे यांचे वर्तन गादीचा सन्मान ठेवणारे असते तर ठीक होते. आपण कोणासमोर झुकत आहोत, याचा विचार उदयनराजे यांनी केला पाहिजे होता. पण ते साता-यातून उमेदवारी मिळवण्यासाठी चार दिवस दिल्लीत होते. दिल्लीच्या तख्तासमोर तिकीट द्या, तिकीट द्या, असे सांगत होते. उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक झाले, ही गोष्ट लोकांना फारशी आवडणार नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.
शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात. शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद, हिंमत, कर्तृत्त्व आहे त्यांना मोठे केले. खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहेत. सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही, या शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी उदयनराजेंच्या उमेदवारीवरून हल्लाबोल केला.
शाहू महाराजांना उमेदवारी द्या म्हणून फिरावे लागले नाही. साता-याच्या गादीचा इतिहास फार मोठा आहे. अशाप्रकारे उमेदवारी मिळवणे म्हणजे त्या गादीचा अपमान आहे. ज्याचा वारसा सांभाळता त्या गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिले होते. त्या गादीवर बसलेला वारस हा जर दिल्ली पुढे नतमस्तक होत असेल तो तुमचा नाही, तर उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी साता-यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. राजेंनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती. सातारा मतदारसंघात उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून प्रचारालाही लागले होते. गावोगावी भेटी, लोकांशी संवाद सुरू केला होता. साता-याची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे राहणार की भाजपा लढवणार हा प्रश्न होता. उदयनराजे भोसले यांनी कमळ चिन्हाशिवाय इतर चिन्हावर लढण्यास नकार दिल्याची माहिती होती. त्यामुळे या जागेवरून महायुतीत चर्चा सुरू होती. अखेर ही जागा महायुती भाजपाकडे गेली.