मुंबई : सावरकरांच्या भूमीत राहुल गांधी येतायेत. त्यांचं स्वागत होतंय. भारत जोडो न्याय यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होतील. नाशिकमध्ये आम्ही यजमान आहोत. तिथे राहुल गांधींचे स्वागत होईल.
१७ मार्चला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची एकत्र सभा होणार अशी माहिती देत संजय राऊतांनी वीर सावरकरांवरून मनसेला टोला लगावला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, विरोधकांनी देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. देशात लोकशाही आहे. एकमेकांवर टीका करत असतो. परंतु संविधान, लोकशाही संकटात असते, देश धोक्यात असतो तेव्हा मतभेद विसरून आपल्याला एकत्र यावे लागते.
जे आमच्यावर टीका करतात त्या भाजपा नेत्यांना सांगतो, १९७८ साली आपण सगळे एकत्र का आला होता? मतभेद असतानाही जनता पक्षात का सामील झाला? कारण तेव्हाही असे वाटले होते, देशाची लोकशाही, संविधान संकटात आहे. आजही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे १७ मार्चच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याला उपस्थित राहतील. त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिली आहे. महाविकास आघाडीची ती सभा आहे. त्यामुळे कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येतायेत त्यांचे स्वागत होतेय. मनसेने मुंबईवर जे संकट गुजरात लॉबीकडून येतंय त्यांना बघून घेण्याची भाषा केली पाहिजे. मुंबई गिळली जातेय. मराठी माणसांवर रोज अन्याय होतोय. शिवसेना लढतेय तो विषय गंभीर आहे. हे कसले फालतू विषय काढत बसला? वीर सावरकर हे आमचे पंचप्राण आहेत आणि राहतील. ज्यांना राहुल गांधी काय बोलतील याची चिंता आहे त्यांनी मुंबई महापालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे असे सांगत राऊतांनी मनसेला टोला लगावला.
दरम्यान, सावरकर हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मागील विधानानंतर राहुल गांधींनी त्यावर आपले मत व्यक्त केले नाही. राहुल गांधींचा कार्यक्रम काँग्रेसने ठरवला आहे त्यामुळे वीर सावरकर स्मारकाला भेट देतील का हे त्यांना विचारा, असेही राऊतांनी म्हटले. त्याचसोबत नितीन गडकरींबाबत दिल्लीतील मराठी माणसाचा अवमान होऊ नये यासाठी आमच्या भावना व्यक्त केल्या. मराठी माणसाला अवमान सहन करण्याची सवय नाही. त्यामुळे आम्ही जे बोललो त्यात बालिशपणा काय, चुकीचे काय? तुम्ही वारंवार अपमान सहन करताय हे आम्हाला दु:ख आहे असं म्हणत राऊतांनी गडकरींच्या प्रतिक्रियेवर भाष्य केले.
नाशिकचा खासदार आमचाच होईल
आमची लढाई भाजपासोबत आहे, बाकी कोणते गट लढतायेत माहिती नाही. नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार जिंकेल आणि मोठ्या फरकाने जिंकेल. आमचा पक्ष सक्षम आहे, उमेदवार सक्षम नसतो. पक्ष महत्त्वाचा आहे. नाशिकमध्ये अद्याप कोणतेही नाव जाहीर केले नाही असे राऊतांनी म्हटले.
मनसेने राहुल गांधींना दिला इशारा
राहुल गांधी महाराष्ट्रात येतायेत, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे त्यांची सभा होतेय. वीर सावरकर स्मारक आणि तिथे सावरकरांचे घरदेखील आहे. त्यामुळे सावरकरांबद्दल कुठलेही अपशब्द खपवून घेणार नाही. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा, त्याला हरकत नाही. परंतु सावरकरांबाबत विधान करू नका, असा इशारा मनसेने दिला होता.