मुंबई : विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असताना आणि प्रचारासाठी चार दिवस शिल्लक असताना राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते प्रचारासाठी राज्यभर दौरे करताना दिसत आहेत. या दौ-यात नेत्यांच्या बॅग तपासण्यात येत आहेत. उबाठा शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तिस-यांदा बॅग तपासण्यात आली आहे.
दरम्यान, यवतमाळ येथे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची श्रीगोंदा येथे तिस-यांदा बॅग तपासण्यात आली. यावेळी स्वत: उद्धव ठाकरेंनी व्हीडीओ शूट करत निवडणूक अधिका-यांची चौकशी केली. तुमचे नाव काय? कुठून आलात? कधीपासून काम करताय? अशी चौकशी केली. तसेच याआधी कुणा-कुणाच्या बॅगांची तपासणी केली आहे का? असे सवाल उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिका-यांना विचारले.
उद्धव ठाकरे हेलिपॅडवर हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर निवडणूक अधिकारी अनेक नेत्यांच्या बॅग तपासताना दिसताहेत. पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांची यवतमाळमधील वणी येथे बॅग तपासण्यात आली होती. यानंतर हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. फक्त माझी एकट्याचीच बॅग तपासू नका, तर मोदी-शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याही बॅग तपासा आणि तो व्हीडीओ मला पाठवा, असे उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिका-यांना खडसावले होते. यानंतर अनेक नेत्यांच्या बॅगा तपासण्यात येत आहेत. दरम्यान, आज तिस-यांदा उद्धव ठाकरेंची श्रीगोंदा येथे बॅग तपासण्यात आली.