नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज नियोजित नाशिक दौरा असल्याने ते अयोध्येला हजर नव्हते. आज नाशिक दौ-यावर असताना त्यांनी आपल्या कुटुंबासह काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिराच्या गाभा-यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, त्यांचा भाऊ तेजस ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे यांनी सपत्निक पूजा केली. यानंतर त्यांनी गोदातीरी महाआरती देखील केली.
शिवसैनिक-पोलिसांत बाचाबाची
उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात पूजा केल्यानंतर ते गोदातीरी गेले. पण गोदाघाटावर यावेळी प्रवेशासाठी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेट्स आणि मेटल डिटेक्टर तोडून गोदा घाटावर प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शिवसैनिकांची यावेळी प्रचंड गर्दी बघायला मिळाली. शिवसैनिक मोठ्या संख्येत गोदा घाटावर दाखल झाले. यावेळी आयोजकांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे गोदा घाटावर दाखल झाले. अतिशय मनोभावे यावेळी गोदातीरी पूजा त्यानंतर महाआरती करण्यात आली.