मुंबई : १५ ऑगस्ट २०२४ च्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे. उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणे तानसा आणि मोडकसागर धरणांच्या सांडव्यावर तिरंग्याने रोषणाई करण्यात आली. घरोघरी तिरंगा मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईतून नयनरम्य दृश्ये समोर आली आहेत. रात्रीच्या अंधारात तिरंग्याचे दर्शन घडवणारे दृश्य सर्वांनाच थक्क करणारे आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ ही सोशल मीडियावर समोर आले आहेत.
यावषीर्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेनिमित्त घरोघरी मोफत तिरंगा वाटप केले जाणार आहे. तसेच विभागांमध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा दौड, सुशोभिकरण, रोषणाई करण्यात येणार असून या कामासाठी मुंबई महानगरपालिका तब्बल साडेतीन कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करणार आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना प्रत्येकी १२ लाख रुपये, शिक्षण विभागाला ५२ लाख रुपये आणि तिरंगा खरेदीसाठी वेगळा निधी खर्च केला जाणार आहे.
याशिवाय राज्यभर ही मोहिम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक घरामध्ये राष्ट्रध्वज आणि तिरंगा प्रदर्शनास प्रोत्साहन देणे हा आहे जेणेकरून देशातील सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता आणि अभिमान वाढेल.