परभणी : मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसात हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला तर थंडीमध्ये वाढ देखील जाणवली आणि नंतर अचानक कमी झाली. यामुळे पिकावर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.
शेतीविषयक विविध समस्या जाणवत आहेत. शेतक-यांच्या सेवेसाठी विद्यापीठ कटिबद्ध असून यावर समाधान मिळण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने विशेष शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादातून केवळ शंका समाधानावरच भर देण्यात येणार आहे. याचा शेतक-यांना समस्या सोडवण्यासाठी लाभ मिळेल अशी आशा कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी – शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा २३वा भाग कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दि.६ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी एम वाघमारे म्हणाले की, शेतकरी दररोज स्वत:च्या शेतीमध्ये जातो व शेतीमधील अडचणी जाणून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो यामुळे शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे. शेतक-यांना त्यांच्या जाणवलेल्या समस्या विद्यापीठास कळवाव्यात. विद्यापीठ त्याचे समाधान करण्यासाठी तत्पर आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी मराठवाड्यातील सर्वच जिल् तील शेतक-यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घेण्याचे विद्यापीठाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.