मुंबई : मिलिंद देवरा यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरुन भाजपच्या नाराजीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. दक्षिण मुंबई प्रमाणेच इतर देखील जागांवर वादाची ठिणगी महायुतीत आहे. अशीच काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीत देखील पाहिला मिळत आहे.
भाजपने मिशन 45 प्लसचा विचार करता जर उमेदवार निवडून येणारा असेल तर प्रसंगी विरोधी पक्षातून आयात करुन निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीत ज्याची ताकद जास्त त्यालाच सर्वांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
वाद निर्माण होऊ शकेल असे महायुतीचे मतदारसंघ
1) रत्नागिरी-सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या किरण सामंत लढण्यास इच्छुक तर भाजपकडून रविंद्र चव्हाण यांना तयारी करण्याचे आदेश.
2) रायगड : राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना स्थानिक भाजप पदाधिका-यांनी विरोध करताना धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी.
3) शिरुर : अजित पवार यांनी मतदारसंघावर दावा केला, परंतु शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.
4) मावळ : शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असा पक्षाकडून दावा करण्यात आला असला तरी राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीला जागा सोडण्याची अजित पवारांकडे मागणी केली आहे.
5) सातारा : अजित पवारांनी जागा लढणार असं म्हटलं असलं तरी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आपणच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
6) कोल्हापूर : शिवसेनेचे संजय मंडलिक खासदार, मात्र भाजपकडून अमल महाडिकांसाठी प्रयत्न सुरु आहेत.
7) अहमदनगर : भाजपचे सुजय विखे निवडणूक लढणार अशी चर्चा असताना निलेश लंके यांची राम शिंदे यांच्यासोबतची वाढती जवळीक विखे कुटुंबासाठी डोके दुखी ठरण्याची शक्यता आहे कारण लंके स्वत: लोकसभेसाठी तयारीत आहेत
8) संभाजीनगर : लोकसभा युतीच्या जुन्या जागा फॉर्मुल्यानुसार शिवसेनेकडे येते. मात्र गेल्या वर्षभरापासून भाजपाचे भागवत कराड हे तयारी करत आहेत. शिवसेनेकडून देखील संदिपान भुमरे यांच्यासह अन्य नेते इच्छुक आहेत त्यामुळे या जागेवरून देखील ओढाताण होणार.
महाविकास आघाडीतील वाद निर्माण होणारे मतदारसंघ
1) उत्तर पश्चिम : अमोल किर्तीकर उमेदवार असतील अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. मात्र संजय निरुपम यांनी या मतदारसंघावर दावा सांगताना कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
2) ईशान्य मुंबई : उद्धव ठाकरे यांनी संजय दीना पाटील या ठिकाणाहून लढतील अशी घोषणा केलीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील राखी जाधव यांच्यासाठी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
एकंदरीतच महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत जागा वाटपावरुन नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीकडे उमेदवारांची वाणवा आहे तर महायुतीत उमेदवारांची भाऊगर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटप करताना वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.