नागपूर : राज्यात यंदा मान्सूनने सरासरी गाठली नाही. सरासरी न गाठता यंदा मान्सूनने निरोप घेतला. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे वातावरण बदलले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सुरू झाला आहे. त्याचवेळी हवामान विभागाने चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
११, १२ आणि १३ फेब्रुवारीसाठी हा अलर्ट दिला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रबी पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे रबीतील गहू, काढणीला आलेला हरभरा, तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शेतक-यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लॉमीक सर्क्युलेशनमुळे विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान रिमझिम पाऊस पडू शकतो. १० आणि ११ फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये पाऊस पडेल. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस
पश्चिम बंगालमध्ये १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो. १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला, तेलंगणामध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला आणि केरळमध्ये १४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.