23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात अवकाळी

राज्यात अवकाळी

- शेतकरी संकटात - शेतीचे नुकसान

पुणे : राज्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला. शेत आणि शेतक-यांना या पावसाचा फटका बसला. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही या पावसाचा फटका बसला. त्यांच्या मुलाचे शुक्रवारी लग्न होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरात पाऊस झाला.

बुलडाणा जिल्ह्यात पाऊस
बुलडाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात शनिवारीही अवकाळी पाऊस पडत आहे. मोताळा तालुक्यामध्ये पाऊस झाल्यावर आता खामगाव तालुक्यातसुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, तूर, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

जळगाव, नगर जिल्ह्यात पाऊस
अहमदनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पाऊस सुरू झाला. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना स्वेटर सोडून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. या पावसाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासह पावसामुळे हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही होणार आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतक-यांच्या रबीच्या व काढणीला आलेल्या तूर पिकाला फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे रबीतील गहू, हरभरा, मका तसेच शेतक-यांनी शेतात काढून ठेवलेले तूर पीक खराब झाले. शेतकरी तिस-यांदा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे.

पालघरमध्ये पावसाची शक्यता
नैऋत्य अरबी समुद्रात सक्रिय चक्रवाताच्या स्थितीमुळे पालघर जिल्ह्यात ८ जानेवारी रोजी एक-दोन ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात पुढील पाच दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यताही वर्तविली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR