पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात वळवाच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे. दोन दिवस राज्यात वादळी वा-यासह पावसाचा इशारा कायम आहे. तर उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमान कमी-जास्त होत आहे. जळगाव, नाशिकमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वा-यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (५०-६० किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (५०-६० किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
लातूरसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट
जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वा-यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.