नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावरून गुरुवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. सरकारने यावर उत्तर द्यावे आणि या मुद्यावर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. दरम्यान, लोकसभेतील १४ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. त्यात काँग्रेसचे ९, सीपीएमचे २, सीपीआयचे १ आणि द्रमुकचे २ खासदार होते. यामध्ये काँग्रेसचे टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांचा समावेश आहे. लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.
कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेत्यांनी घोषणाबाजी सुरू केली. लोकसभेतील बहुतांश विरोधी खासदारांनी सभापतींच्या खुर्चीजवळ जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी विरोधी पक्षाचे खासदार गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. लोकसभेची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी असून त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, असे सभापती म्हणाले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन कामकाजात भाग घ्यावा, अशी विरोधी पक्षाच्या खासदारांची मागणी आहे.