न्यूयॉर्क : जगभरातून इतर देशांमध्ये जाऊन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. अशातच भारतातून अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून अमेरिकेने व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. हे बदल एफ आणि एम श्रेणीतील व्हिसाधारकांसाठी करण्यात आले आहेत. या अंतर्गत यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने अमेरिकन शैक्षणिक संस्थांमधील अभ्यास आणि रोजगार श्रेणीमध्ये स्थलांतरित व्हिसासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.
व्हिसासंदर्भातील नवे अद्ययावत धोरण विद्यार्थ्यांच्या स्थितीतील बदल, त्यांच्या यूएसमध्ये राहण्याच्या कालावधीत वाढ, तसेच एफ आणि एम श्रेणीतील विद्यार्थ्यांची स्थिती पुनर्संचयित करण्यासाठीच्या अर्जांशी संबंधित आहे. ही नव्या गाईडलाईन्स २० डिसेंबर रोजी जारी करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, एफ आणि एम व्हिसाधारक तात्पुरत्या कालावधीनंतरही अमेरिकेत त्यांच्या इच्छेनुसार राहू शकतात असे या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पदवीधर विद्यार्थी आता सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी ३६ महिन्यांचे वैकल्पिक व्यावहारिक प्रशिक्षण घेऊ शकतात. याशिवाय, या गाईडलाईन्समध्ये असेही म्हटले आहे की, एफ व्हिसा असलेले विद्यार्थी विज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्सच्या पदवीच्या आधारे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग मुदतवाढीसाठी अर्ज करू शकतात. अमेरिकेत शिकणा-या १० लाख परदेशी विद्यार्थ्यांपैकी २५ टक्क्यांहून अधिक भारतीय विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
एफ आणि एम व्हिसा म्हणजे काय?
अमेरिकेत व्यावसायिक अभ्यासासाठी एम व्हिसा जारी केला जातो, तर एफ व्हिसा सामान्य अभ्यासासाठी जारी केला जातो. अर्जदारांना अमेरिकेतील कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील अभ्यासानुसार एफ किंवा एम व्हिसा दिला जातो. दोन्ही प्रकारच्या व्हिसाच्या अंतर्गत, एखाद्याला ६० महिने अमेरिकेत राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
एच-१बी व्हिसाबाबत निर्णय
अमेरिकेच्या बायडन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्याचा भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. अमेरिकन सरकारने एच-१बी व्हिसाच्या देशांतर्गत नूतनीकरणासाठी पायलट कार्यक्रम सुरू केला आहे. २४ जानेवारीपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. हा एच-१बी व्हिसा पायलट प्रोग्राम फक्त भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांसाठी आहे. या अंतर्गत अमेरिकेत काम करणा-या भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि कॅनडाच्या नागरिकांना फायदा होणार आहे. हा कार्यक्रम अशा कंपन्यांसाठी देखील आहे, ज्यांचे एच-१बी कर्मचारी कामासाठी परदेशात जाऊ इच्छितात.