25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeराष्ट्रीयवरुण गांधी आईच्या प्रचारात सक्रिय

वरुण गांधी आईच्या प्रचारात सक्रिय

अमेठी, रायबरेलीचे कौतुक

सुलतानपूर : वृत्तसंस्था
पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकिट कापण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपासून दूर असलेले वरुण गांधी अखेर सक्रिय झाले आहेत. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मतदारसंघात त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात त्यांच्या आई मनेका गांधींना भाजपने सलग दुस-यांदा रिंगणात आणले आहे. वरुण गांधीही या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून ते प्रचारापासून दूर असल्याने तर्कवितर्क लढवले जात होते.

वरुण गांधी यांनी आई मनेका गांधी यांचा प्रचार सुरू केला आहे. पहिल्याच सभेत त्यांना अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचीही आठवण झाली. ते म्हणाले, आम्ही काही वर्षांपूर्वी निवडणूक लढण्यासाठी सुलतानपूरमध्ये आलो त्यावेळी लोक म्हणाले होते, अमेठी आणि रायबरेलीमध्ये जे वैभव आहे, तसेच वैभव सुलतानपूरमध्येही यावे. आज देशात सुलतानपूरही मुख्य प्रवाहात पहिल्या रांगेत असल्याने आनंद होत आहे.

सभेला संबोधित करताना वरुण गांधी म्हणाले, संपूर्ण देशात ५४३ मतदारसंघांत निवडणूक होत आहे. अनेक ठिकाणी मोठे, अनुभवी, करिष्मा दाखवणारे लोक निवडणूक लढवत आहेत. पण संपूर्ण देशात सुलतानपूर हा एकच मतदारसंघ असा आहे, जिथे खासदाराला कुणी खासदारजी म्हणत नाहीत, मंत्री म्हणून किंवा नावानेही बोलवत नाही. सुलतानपूरमधील लोक खासदारांना माताजी म्हणतात.

दरम्यान, वरुण गांधी प्रचारात सक्रिय झाल्यानंतर मनेका गांधींची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मी म्हटल्यानंतर ते प्रचाराला आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्या तुलनेवर बोलताना त्या म्हणाल्या, प्रत्येकाचे स्वतंत्र मार्ग असतात, नशीब असते. कुवतीनुसार प्रत्येक जण आपला मार्ग निवडतील, असेही मनेका गांधी म्हणाल्या.

पीलीभीत लोकसभा मतदारसंघ सहावेळा जिंकली
पीलीभीत लोकसभा मतदारसंघात १९९६ पासून मनेका गांधी आणि वरुण गांधी यांचा वरचष्मा राहिला आहे. या मतदारसंघातून गांधी यांनी सातवेळा निवडणूक लढली आणि सहावेळा जिंकली आहे. तर वरुण गांधी दोनदा खासदार होते. मात्र, २०२४ मध्ये १९९६ नंतर पहिल्यांदाच दोघेही निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्यामुळे वरुण गांधी नाराज असल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR