मुंबई (प्रतिनिधी) शिवसेना ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून युवा सेना सचिव वरूण सरदेसाई विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जाहीर केले आहे त्यामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वरूण सरदेसाई विरोधात स्थानिक आमदार झिशान सिद्दिकी यांच्यात लढत होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहायला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा वांद्रे येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना अनिल परब यांनी वरूण सरदेसाई यांच्या उमेदवारीची घोषणा केली. अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झालेले नाही मात्र अनिल परब यांनी थेट वरूण सरदेसाई यांच्या नावाची घोषणाच केल्याने वांद्रे पूर्व मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मी स्वत: तसेच इतर पदाधिकारी यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत भेट झाली आहे. उध्दव ठाकरे यांनीच वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरूण सरदेसाई यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केल्याचे अनिल परब यांनी जाहीर केले.
वरूण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांच्या सोबत युवा सेनेत आधीपासूनच सक्रिय आहेत. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात वरूण सरदेसाई यांचा राज्याच्या राजकीय तसेच प्रशासनिक वर्तुळात दबदबा वाढला होता. वरूण यांनी लोकसभा निवडणुकांपासूनच वांद्रे पूर्व मतदारसंघात लक्ष केंद्रित केले होते. स्थानिकांच्या भेटीगाठी घेण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. वांद्रे पूर्व येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनरही लावले होते. आता पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
वरूण सरदेसाई यांचा सामना आता विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांच्याशी होणार आहे. झिशान हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली आहे.