22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रवसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट

वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट

मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा उद्या होण्याची शक्यता असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौ-यावर असून १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर त्यांची सभा होत आहे. दुसरीकडे नाराज नेते संधी शोधत दुस-या पक्षात उड्या मारताना दिसून येतात. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्याहस्ते त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करुन शरद पवारांची विचारधारा हीच माझी विचारधारा असल्याचे म्हटले. तर, मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही शरद पवारांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकांचे संकेत दिले. त्यानंतर, वसंत मोरेंनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे.

वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, मनसेला राम राम केल्यानंतर मोरे यांना काँग्रेस, शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांकडून ऑफर असून स्वत: संजय राऊत यांनीही फोन करुन वसंत मोरेंशी चर्चा केली होती. तर, वसंत मोरे हे वॉशिंग मशिनसोबत जाणार नाहीत, असेही राऊतांनी म्हटले होते. आता, मोरे यांनी शरद पवारांनंतर आज संजय राऊतांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. वॉशिंग मशीन नको, असे मोरे यांनी म्हटले आहे.

वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी यापूर्वीही पत्रकार परिषेद आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफरही देण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आमदार रंिवद्र धंगेकरांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे, आपण धंगेकर यांच्याशी फोनवर बोललो असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचेही मोरे यांनी म्हटले.

महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची मी भेट घेतली आहे. मी ज्या नेत्यांची भेट घेतली ती सर्वांसमोर घेतली असून कुठलीही पडद्याआड चर्चा नाही. तसेच, मी सर्वांना माझी भूमिका सांगितली असून मला पुणेकरांसाठी ही निवडणूक लढायची आहे असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. तसेच, महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत माझी सकारात्मक चर्चा होत असून पुण्यात वॉशिंग मशीन नको, असे म्हणत वसंत मोरे यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. तर, काँग्रेस आमादर रविंद्र धंगेकरांसोबत माझे फोनवर बोलणे झाले आहे, लवकरच त्यांची भेट घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR