22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीयवेध ४ जूनचे!

वेध ४ जूनचे!

व्यक्ती तितक्या प्रकृती. कोणाला कशाचे वेध अथवा वेड असावे याला बंधन नाही. काही जणांना आयपीएलचा विजेता कोण याचे वेध लागले असतील, काहींना टी-२० विश्वकपचे, बळिराजाला मान्सून वेळेवर बरसतो काय याचे वेध तर अनेकांचे लोकसभा निवडणुकीचा विजेता कोण यासाठी ४ जूनकडे डोळे लागले असतील. महाराष्ट्रात मतदानाचे सर्व पाच टप्पे पार पडले आहेत. मात्र, देशात आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. पैकी सहावा टप्पा आज पार पडेल. मतदान संपल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर निकाल काय लागतो याची उत्सुकता सा-यांनाच असते. मतदानपूर्व आणि मतदानोत्तर सर्व्हे करून निकालाचा अंदाज वर्तवण्याची काहींना घाई झालेली असते. शिजजेपर्यंत दम धरला जातो पण निवजेपर्यंत नाही असे म्हणतात तेच खरे! तीन राज्यांत भाजपला फटका बसेल असा अंदाज भाजपच्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. भाजप नेत्यांचा अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे.

पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल तर महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणात पक्षाला फटका बसेल. या राज्यांत होणा-या नुकसानीची भरपाई पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, तेलंगणामधून होईल अशी चर्चा आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून आणखी दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. ४ जून रोजी मतमोजणी केली जाईल. मतदारांनी यावेळी कोणाला कौल दिला ते प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच समोर येईल. परंतु त्या आधी देशात ४ जूननंतर काय होईल याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय विश्लेषकही आपली मते व्यक्त करीत आहेत. प्रत्येकजण आपल्या पातळीवर आणि भूमिकेनुसार भाकित व्यक्त करीत आहेत. राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी ‘चारसौ पार’चे उद्दिष्ट गाठू शकणार नसली तरी नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील असे भाकित व्यक्त केले आहे. एनडीएचे नेते मात्र चारशे पारचे टार्गेट पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त करत आहेत. याआधीही देशात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्तांतरे झाली आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली तेव्हा ‘इंडिया शायनिंग’ची मोहीम राबविण्यात आली होती परंतु ती अपयशी ठरली होती.

देशात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाला सुद्धा मतदारांचे अंदाज न आल्यामुळे सत्तांतराचा सामना करावा लागला होता. यावेळी सत्ताधारी आघाडी चारशेपेक्षा जास्त जागा मिळवेल की नाही याबाबत उत्सुकता आहे. लोकसभेच्या २८० जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येऊ शकत असल्यामुळे भाजपला चारशेचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले तरी तो नक्कीच तीनशे जागा मिळवेल याची खात्री असल्याने सत्ता त्यांचीच येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. ४ जूननंतर नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारचा रोड मॅप काय असेल याबाबतच्या सूचनाही नरेंद्र मोदी यांनी आधीच अधिका-यांना दिल्या असल्याची चर्चा आहे. ४ जूननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना झोळी घेऊन जावे लागेल हे विरोधी नेत्यांचे वक्तव्य व्यासपीठ गाजविण्यासाठी आणि टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे. परंतु त्यांनाही वस्तुस्थितीची जाणीव असेलच. नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका करताना काँग्रेसला राहुल गांधी यांच्या वयापेक्षाही कमी जागा मिळतील अशी टीका करणे सर्वस्वी चुकीचेच आहे.

कारण देशातील मतदारांनी नक्की काय निश्चित केले आहे ते ४ जूननंतरच समजणार आहे. १ जून रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करतील. अर्थात ओपिनियन पोल असो वा एक्झिट पोल मतदार मतदानाविषयी खरी माहिती देईलच असे नाही, मात्र, मतदारांनी दिलेल्या कौलाचे साधारण चित्र समजू शकते. विविध पक्षांची नेतेमंडळी विजय ‘आपलाच’ असल्याचे सांगत आहेत. इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे देशात भाजपला जनतेने नाकारल्याचे ठासून सांगत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहासुद्धा भाजपच्या विजयाची हमी देत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राजकीय जाणकार आणि अभ्यासक इयान ब्रेमर यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपला नेमक्या किती जागा मिळतील तेही सांगितले आहे. त्यांनी भाजपला ३०५ जागा मिळतील असे म्हटले आहे. यात १० जागा कमी-जास्त होऊ शकतात. नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील असेही त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर काही निष्कर्ष समोर आले आहेत ते असे- २०१४ च्या निवडणुकीत काँगे्रसविरोधी लाट होती.

२०१९ च्या निवडणुकीत पुलवामाचा हल्ला आणि त्याला बालाकोटमध्ये दिलेल्या उत्तरामुळे देशप्रेमाची लाट होती. यंदाच्या निवडणुकीत तशी कोणतीही लाट नाही. मतदारांमध्ये नैराश्य दाटले आहे, त्यामुळे मतदान कमी झाले आहे. मोदी यांच्या दहा वर्षांच्या कारभारामुळे ‘अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी’चा फटका बसणार आहे. तो बसू नये म्हणून भाजपने अन्य पक्षांमध्ये फूट पाडून अनेकजणांना पक्षात घेतले आहे. लोकसभेची आतापर्यंतची निवडणूक आक्रमक सत्ताधारी आणि बचावाच्या पवित्र्यातील विरोधक अशीच झाली. यात कोण बरोबर, कोण चूक हा संशोधनाचा भाग आहे. देशात अनेक मूलभूत प्रश्न आहेत. कांदा निर्यात, किमान हमीभाव, महागाई, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत. भाजपला या मुद्यांवर चर्चाच होऊ द्यायची नव्हती. राहुल गांधी भाजपला याच मुद्यांवर आणण्याचा प्रयत्न करत होते. आज देशात महागाई आहे, बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे परंतु सत्ताबदल घडवेल इतका राग, संताप जनतेच्या मनात आहे असे वाटत नाही. अर्थात हा राग, संताप मतपेटीत बंद झाला असेल तर माहीत नाही. त्यासाठी ४ जूनचीच वाट पहावी लागेल.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR