पुणे : लोकसभेच्या जागा वाटपाची महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. आंबेडकरांच्या प्रवेशासाठी आमची काहीही हरकत नाही. पण अद्याप निवडणूक जाहीर झालेल्या नसल्याने महाविकास आघाडीत त्यांच्या प्रवेशाचा निर्णय जाहीर झालेला नाही, असे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथला यांनी सांगितले.
पुण्यात काँग्रेस भवन येथे पश्िचम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची बैठक आज (ता.२३) आयोजित केली आहे. त्यापूर्वी चैन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
काँग्रेसने नेहमीच सर्व जाती धर्मांना सोबत घेतले, पण सध्याची स्थिती पाहता धर्माच्या नावावर विभागणी सुरू करून देशातील महान परंपरा तोडली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही मंदिरात प्रवेश घेण्यापासून रोखले गेले. देव हा एका व्यक्तीचा नाही. अयोध्येतील कार्यक्रमात मोदींचे भाषण निवडणुकीसाठी होते, चैन्नीथला अशी टीका केली.
काँग्रेसचा कोणताही नेता भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, भाजप चर्चा घडवून आणून अफवा निर्माण करत आहे. हे तोडफोड करून स्थापन झालेले सरकार आहे, यास जनतेचा पाठिंबा नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी चांगले यश मिळवेल, असा दावा चैन्नीथला यांनी केला.
लोकसभेचे नाव काढताच चव्हाणांनी जोडले हात
पत्रकार परिषदेमध्ये रमेश चेन्नीथला यांना पृथ्वीराज चव्हाण हे सातारा किंवा पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे विचारला. त्यावर चव्हाण यांनी लगेच हात जोडत मी लोकसभेसाठी इच्छुक नाही असे सांगितले. तर चैन्नीथला यांनी ‘पृथ्वीराज चव्हाण राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून उभे राहू शकतात’ असे उत्तर दिले.